धरण उशाला, कोरड घशाला, संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतला ठोकले टाळे, ग्रामसेवकाचे दुर्लक्ष...
दिलीप शिंदे
सोयगाव : गलवाडा (अ) ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने वयोवृध्द महिलांना डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी दि.१४ मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढीत धरण उशाला कोरड घशाला अशी घोषणाबाजी करीत ग्रामपंचायतला टाळे ठोकले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, गलवाडा (अ) गावाच्या उशाशी असलेल्या वेताळवाडी धरणात गावास पाणीपुरवठा करणारी विहीर असून विहिरीला मुबलक पाणी असून सुद्धा ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारामुळे गावात वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही त्यामुळे गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी सोळा कॉक आहेत. नळाला पाणी आलेच तर वीस मिनिटे पाणी सोडण्यात येते.त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.आता तर पंधरा दिवसपासून नळाला पाणी येत नसल्याचे संतप्त महिलांनी सांगितले. त्यामुळे वयोवृध्द महिलांना पाण्यासाठी उष्णतेची पर्वा न करता हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या हातपंप जवळून गटार गेली आहे.वेळोवेळी गटारीची स्वच्छता ग्रामपंचायत कडून केली जात नाही.त्यातच हातपंपाजवळ ग्रामपंचायत कडून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गावातील सांड पाणी व शौचालयाचे पाणी गटारीने वाहत येऊन ते सांड पाणी हातपंपाजवळ साचत असल्याने सांड पाण्यातच हंडे ठेऊन हातपंपाचे पाणी उपसावे लागत आहे. या दूषित पाण्यामुळे लहान मुलांसह गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्यासाठी वीस रुपयाला हंडा भर पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. दरम्यान हंडा मोर्च्यात सकूबाई कैलास इंगळे,कमलाबाई धोंडीराम माचाटे, ममताबाई वसंत लवटे,रमाबाई नामदेव माचाटे,उषाबाई कडूबा सोनवणे, सकूबाई कृष्णा लवटे,गयाबाई कडूबा लवटे,अनुसयाबाई दशरथ कांबळे,मंडाबाई खंडू दणके,इंदूबाई शिवदास सोनवणे,मंगलाबाई मधुकर सोनवणे आदींसह महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढीत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास वेताळवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. ग्रामपंचायत वेळेवर सुरळीत पाणीपुरवठा करते की महिलांना जलसमाधी आंदोलन करण्यास भाग पाडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
धरण उशाला, कोरड घशाला, संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतला ठोकले टाळे, ग्रामसेवकाचे दुर्लक्ष...
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२४ ०५:२५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: