पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज या प्रकरणातील दोन आरोपींना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अन्य तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर ते ओंकारेश्वर या मार्गावरील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर दाभोलकर यांची सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हे पुरोगामी विचारवंत असल्याने त्यांच्या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले होते. मागील १० वर्षांहून अधिक काळ हा खटला सुरू होता. दरम्यान या खटल्याच्या तपासकामात ढिलाई होत असल्याचे आरोप करीत काही संस्था, संघटनांनी निदर्शनेही केली. तर या खटल्याच्या तपासकामात अनेक विसंगती असल्याचे नमूद करणारी पुस्तकेही प्रकाशित झाली होती.
हा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्बन नक्षलवाद्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी रचलेले कारस्थान विफ़ल झाले आहे, अशा शब्दात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या तास ते दीड तासात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ही दिशा प्रमाण मानून तपास करण्यात आला असे राजहंस यांनी म्हटले असून. दोषी ठरविण्यात आलेल्या दोघांचे नातेवाईक उच्च न्यायलयात दाद मागतील. आणि, तेथे त्यांना न्याय मिळेल. त्यांना निर्दोष ठरविले जाईल अशी आशा व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: