विशाल अग्रवालला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवर शाईफेक; काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर 'हिट अॅन्ड रन' केसमधील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी काल छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली होती. त्यांना आज २२ मे रोजी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी व्हॅनमधून आणले असता काहीजणांनी व्हॅनवर शाईफेक केली. पोलिसांनी पाच ते आठ जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले. ते वंदेमातरम या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे समजते.
१८ मे रोजी विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाने पोर्श ही अलिशान गाडी बेभानपणे चालवून मोटारसायकल वरून जाणार्या एक तरुण आणि तरुणीला चिरडले होते. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
त्यानंतर तो मुलगा चालवत असलेल्या कारची नोंदणीच झाली नसल्याचे, तसेच त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे पुढे आले होते. शिवाय त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात वडिलांनी आपणाला गाडी नेण्याची परवानगी दिली होती. आणि, आपण दारू पितो हे वडिलांना माहीत होते असे सांगितल्यामुळे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३,५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याखेरीज आपला मुलगा अल्पवयीन आहे तरी तो दारू पितो हे माहित असूनही त्याला त्यापासून परावृत्त न करता पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियम कलम ७५ आणि ७७ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला. याचे गांभीर्य अधिक असल्याने विशाल अग्रवाल यांनी पुण्यातून फरार होणे पसंत केले. परंतु जनमताच्या रेट्यामुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना कॉल करून कानपिचक्या देत सडेतोड कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. त्यांना आज २२ मे रोजी दुपारी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यासाठी व्हॅनमधून आणले असता काही व्यक्तीनी व्हॅनवर शाईफेक केली. पोलिसांनी शाईफेक करणार्यांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात जेव्हढा अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे तेव्हढेच त्याचे वडील जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. एव्हढेच नव्हे तर त्या रात्री त्या मुलासोबत पबमध्ये दारू प्यायलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंदेमातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे समजते. या प्रकरणात कारवाई करण्यात कसुरी झाली तर मोठे आंदोलन उभारण्यात येईल असेही या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: