पुणे : पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्यविभाग प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बेकायदेशीर कामे करण्यास नकार दिल्याने तानाजी सावंत यांनी आपणावर निलंबनाची कारवाई केली असा गंभीर आरोप पवार यांनी या पत्रात केला आहे.
डॉ. पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागातील जेष्ठतम अधिकारी असून माझी एकूण सेवा ३० वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे एकूण १३ वर्षे उत्कृष्ठ कामकाज केलेले आहे. माझे गत ५ वर्षातील गोपनिय अभिलेख अत्युकृष्ट असून वरीष्ठ अधिकारी यांची कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोवीड १९ च्या साथउद्रेकामध्ये मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. विविध कामकाजाबाबत माझा आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागीय आयुक्त, पुणे, जिल्हाधिकारी व पालकमंत्री महोदय (पुणे/सातारा) यांचेमार्फत वेळोवेळी सत्कार झालेला आहे. सद्यास्थितीत मी आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख), पुणे महानगरपालिका येथे दि.१३ मार्च २०२३ पासून कार्यरत होतो, सदरहू ठिकाणी माझ्या कामकाजाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबत प्रतिकूल शेरे नाहीत. तरीही माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत व हे मला दि. २४ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता मिळाले. माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून व हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मा.मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करणेस दबाव आणला होता. परंतू मी नियमबाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरु केली होती. आणि आरोग्य अधिकारी(प्रमुख), महानगरपालिका पुणे हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २९ एप्रिल २०२४ रोजी चौकशी समिती स्थापन करुन चौकशी न करताच घाईगडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करुन मला निलंबित करणेत आलेले आहे. सबब माझे निलबंन हे माझ्याविरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करित असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे. तरी कृपया माझे केलेले निलबंन मागे घ्यावे ही नम्र विनंती आहे.
ङॉ. भगवान पवार यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यसचिव व अपर मुख्यसचिव यांनाही अग्रेषित केले आहे.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे थेट नाव घेत आरोप केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. आता मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या विषयी काय भूमिका घेणार याकडे पुणे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२६/२०२४ ०४:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: