ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना हातकड्या; कल्याणीनगर अपघातातील'त्या' मुलाचा रक्त तपासणी अहवाल बदलला
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारखाली चिरडून दोघांचा बळी घेतला होता. या प्रकरणी त्याच्या रक्ततपासणीचा अहवाल बदलल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना आज २७ मे रोजी पहाटे त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.
डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर अशी या दोन डॉक्टरांची नावे आहेत. तावरे हे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत. तर, त्या मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यावेळी ससून रुग्णालयामध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर सीएमओ म्हणून म्हणून ड्युटीवर होते.
त्या बड्या बिल्डरपुत्राने अपघात केल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी त्याला पोलिसांनी तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या तपासणीच्यावेळी घेण्यात आलेले रक्तनमुने या दोन्ही डॉक्टरांनी बदलले. त्यामुळे संपूर्ण केसला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि पोलिसांनी दुसर्यांदा रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये या नमुन्यांची डीएनए टेस्ट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर पोलिसांनी आज २७ मे रोजी पहाटे या दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन बेड्या ठोकल्या.
या प्रकरणात या दोन्ही डॉक्टरांना रिपोर्ट बदलण्यासाठी भलीमोठी रक्कम मिळाल्याची चर्चा सध्या पुण्यात सर्वत्र सुरू आहे.
ड्रगमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालय पुरते बदनाम झाले होते. त्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयातील काळ्या धंद्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२४ ११:२४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: