मुंबई : अॅन्टीकरप्शन खात्याच्या अधिकार्यांनी सातपूर, नाशिक येथील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि उपशिक्षकावर १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. १२ मे रोजी हा प्रकार घडला.
सुभाषचंद्र कौसलप्रसाद मिश्रा, मुख्याध्यापक, दिनेशकुमार जमनप्रसाद पांडे, उपशिक्षक अशी या दोघांची नावे आहेत हे दोघेही श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विदयालय, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक येथे नोकरीस आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार यांच्या दोन्ही मुलांना या शाळेत प्रवेश घ्यावयाचा होता. त्यासाठी इमारत निधीच्या नावाखाली १६ हजार रुपयांची मागणी मिश्रा आणि पांडे यांनी तक्रारदाराकडे केली. या पैशांची पावती मिळणार नाही असेही सांगितले.
तक्रारदाराने याबाबत अॅन्टीकरप्शन खात्याच्या नाशिक येथील कार्यालयाकडे तक्रार दिली. अधिकार्यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला. आणि, दिनेशकुमार पांडे यांना १० हजार रुपये लाच घेताना पकडले.
या प्रकरणी सातपूर पोलीसठाण्यात १२५/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये १२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: