'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' मुलाचे वर्तन शाळेतही उद्दामपणाचे?; माजीमंत्र्याच्या पत्नीने मांडली सोशल मीडियावर व्यथा
पुणे : कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे प्रताप आता सोशल मीडियावरून चर्चिले जाऊ लागले आहेत. माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवरून तीन संदेश प्रसारित केले आहेत. त्यात त्यांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाचे प्रताप कथन केले आहेत.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: