कारवाई होत नसल्याने टपरीधारक निर्धास्त
विठ्ठल ममताबादे
उरण : गुटखा,पान मसाला यासारख्या मानवी शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या अन्न पदार्थावर महाराष्ट्रात २०१२ साली गुटखा व पानमसाल्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. या गोष्टीला तब्बल ११ वर्षाचा कालावधी लोटला आहे.मात्र अजूनही कित्येक ठिकाणी छुप्या पध्दतीने गुटखा, पान मसाला विक्री छुप्या पध्दतीने मोठया प्रमाणावर होत आहे. तर उरण तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा पान मसाला विक्री करणाऱ्या टपरीधारकांवर कारवाई होत नसल्याने बिंदास हे दुकानदार खुलेआम गुटखा पानमसाल्याची विक्री करत आहेत.
गुटखा पानमसाला यांच्या सेवनाने अबालवृद्धांवर होणारे परिणाम पाहता राज्यात २०१२ साली कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारने गुटखा बंदीचा कायदा लागू केला. कारण या गुटख्याच्या आधीन शाळकरी मुले व तरुण पिढी मोठ्याप्रमाणात होत होती.गुटखा बंदी कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन, गुटख्याची वाहतूक व विक्रीवर बंदी आणली. सुरवातीला गुटखा बंदी कडक लादली गेली.मात्र सद्यस्थितीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उरण तालुक्यात शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग मोठया प्रमाणावर गुटखा विक्री पाहायला मिळतं आहे. कारवाईच्या भीतीने शहरी भागात गुटखा, पान मसाला छुप्या पद्धतीने विकला जात आहे. मात्र उरणच्या ग्रामीण भागात पोलीस प्रशासन, अन्न नागरी औषध प्रशासन यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने खुलेआम गुटखा, व घातक असा पानमसाला विक्री होत आहे.
खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर पालिका , ग्रामपंचायती, पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रीला कायमची बंदी घालावी, अशी मागणी उरण परिसरातील नागरिकांकडून होत आहे. खुलेआम होणाऱ्या गुटखा पान मसाला विक्रीमुळे शाळेत शिकणारी अल्पवयीन मुले गुटखा व पानमसाल्या सारख्या तब्येतीला हानिकारक अशा पदार्थांचे व्यसन करीत आहेत. गुटखा खाल्ल्याने कित्येकांना तोंडाचा कॅन्सर झाला असून या व्यसनापायी नाहक बळी गेल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. उरणच्या ग्रामीण भागात गुटखा खरेदीसाठी कित्येक नागरिक शहरातून येत असतात. गुटख्याची विक्री करणारे होलसेल विक्रेते उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना विक्रीसाठी खुलेआम माल पुरवित आहेत. अधिक पैसा मिळवण्याच्या लोभापाई हे टपरीधारक लोकांच्या जिवाशी गुटख्याची दामदुप्पट दराने विक्री करून खेळत आहेत.
अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन ग्रामीण भागात फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील गुटखा पान मसाला विक्रेत्यांना रानच मोकळे झाले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या अनेक पानपट्टयावर दुकानात गुटखा पान मसाल्याची विक्री खुलेआम होताना पाहायला मिळतं आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे छुप्या व खुलेआम पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात असो कुणी चुकीचं कृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणारच.- मारुती घोळसवाड, सहाय्यक आयुक्त, अन्न औषध प्रशासन
उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात खुलेआम होतेय गुटखा विक्री
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२४ ०५:३३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/३०/२०२४ ०५:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: