पुणे : पुणे सोलापूर मार्गावर लोणी काळभोर परिसरातील गुलमोहर लॉन्स येथे काल १८ मे रोजी सायंकाळी वादळी वार्याने मोठे होर्डिंग कोसळल्याने दोन व्यक्ती आणि एक घोडा जखमी झाला होता. या प्रकरणी आज १९ मे रोजी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे तपासात आढळल्याने गुलमोहर लॉन्सचे मालक शरद ज्ञानेश्वर कामठे, (जागामालक, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले (रा. खराडी पुणे) व बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम ३३८, ३३७, ४२९, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे (वय-२९, रा.लोणी काळभोर) यांनी तक्रार दिली आहे.
४० बाय ४० आकाराचे हे होर्डिंग विनापरवाना उभारले जात असताना प्रशासन यंत्रणा काय करत होती? या कडे सोयिस्कर दुर्लक्ष का केले गेले? असे प्रश्न यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: