मुंबई : मुंबई विमानतळावर १३ ते १६ मे या चार दिवसात कस्टम्सच्या विमानतळ आयुक्तालय झोन ३ च्या पथकाने परदेशातून येताना सोन्याची तस्करी करू पाहणार्या प्रवाशांवर कारवाई करून ११ किलो ३९ ग्रॅम सोने जप्त केले. तिघांना तस्करी प्रकरणी अटक केली.
या कालावधीत एकंदर २७ वेळा कारवाई करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या प्रवाशांकडून मेणात लपविलेले सोनाचे कण, कच्चे दागिने, रोडियम प्लेटेड पैंजणे, सोन्याच्या वड्या जप्त करण्यात आल्या.
प्रवाशांनी बुरख्याखाली, अंतर्वस्त्रात, गुदाशयात लपविलेले सोने यावेळी जप्त करण्यात आले.
क्वालालंपूर येथून मुंबईस आलेल्या एका परदेशी नागरिकाने १ किलो ९३ ग्रॅम २२ कॅरेट सोने दागिन्यांच्या स्वरुपात आणले होते. त्याला अटक करण्यात आली आहे.
जेद्दाह येथून मुंबईस आलेल्या दोन भारतीय नागरिकांकडे २४ कॅरेटच्या १६ बांगड्या आढळल्या. त्यांनाहीअटक करण्यात आली आहे.
नैरोबीहून मुंबईला येत असलेल्या दोन परदेशी नागरिकांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ५२३ ग्रॅम वजनाच्या ७ सोन्याच्या वड्या आढळल्या. हे प्रवासी त्यांनी परिधान केलेल्या बुरखा आणि जॅकेटच्या खिशामध्ये लपवून या सोन्याची तस्करी करत होते.
आणखी एका प्रकरणात २२ भारतीय नागरिकांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये दुबईहून येणारे १०,अबूधाबीहून येणारे ०३ , जेद्दाह, दुबई, कैरो, दोहा, हाँगकाँग, क्वालालंपूर, मस्कत येथून येणारी प्रत्येकी १ व्यकी आणि कुवैतहून येणारे ३ जण यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकंदर ८ किलो ५७५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. हे सर्व सोने अंतर्वस्त्रांमध्ये, बुरख्याखाली, जीन्सच्या खिशात, गुदाशयात आणि अंगावर परिधान करून त्याची तस्करी केली जात होती. या शिवाय अबुधाबीहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडे १९७ ग्रॅम सोन्याचे कण मेणात लपविलेले आढळले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: