पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण ते शिक्रापूर भागात असलेल्या मोहितेवाडी परिसरातील एका धाब्यानजिक १९ मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका गॅसटँकरला आग लागली. आगीमुळे प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एव्हढी मोठी होती की त्याचे हादरे एक किलोमीटरच्या परिघात जाणवले. परिसरातील घरांना तडे गेले.
मिळालेल्या माहितीनुसार मोहितेवाडी परिसरातील या धाब्यावर नेहमीच वाहने आणि ग्राहकांची गर्दी असते. या धाब्याजवळ १९ मे रोजी पहाटे एक गॅसटँकर उभा होता. पाच वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला आणि मोठा स्फोट झाला. त्याचे हादरे परिसरात जाणवले. या प्रकरणी नागरिकात अशीही चर्चा आहे की, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या टँकरमधून अनधिकृतपणे गॅस काढला जात असताना हा स्फोट घडला. घटनास्थळी ३ ते ४ कमर्शियल वापराच्या टाक्या आढळून आल्या असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती पसार झाल्या असल्याचे समजते. या स्फोटानंतर नागरिकात घबराट पसरली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: