आपचे पिं चिं. युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली मागणी
पुणे : पुणे परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने १९ मे रोजी रात्री अडीच वाजता मद्यधुंद अवस्थेत बेभानपणे कार चालवून दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलमध्ये यथेच्छ दारू ढोसून झाल्यावर बेफाम वेगात कार चालविणारा वेदांत अल्पवयीन असल्याचा साक्षात्कार तपास यंत्रणांना झाला. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी ३०६/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम 279,304(अ) ,337,338,427.मोटार वाहन अधिनियम कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आणि त्याला आज १९ मे रोजी दुपारी जामीनही मंजूर झाला. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असे जाहीर केले होते. आपल्या त्या घोषणेला जागून आता पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने 19/05/2024 रोजी रात्री 02:30 वा. बाॅलर हाॅटेलमध्ये पार्टी करून घरी जात असताना कल्याणीनगर पुणे येथील लॅन्डमार्क सोसायटी जवळ पोर्श कारने भरधाव वेगाने चालवून पल्सर गाडीला धडक दिल्याने त्या गाडीवर असणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक वेदांत अगरवाल याचेवर गु.र.नं.व कलम -306/2024 भादवि कलम 279,304(अ) ,337,338,427.मोटार वाहन अधिनियम कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या व्यक्तीचा आज दुपारी जामीन मंजूर देखिल झाला. परंतु वेदांत अगरवाल ही व्यक्ती 17 वर्षाची आहे तर मोटार वाहन कायदा 2019 प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 199अ नुसार पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. नुकताच 12 वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत ग्रॅज्युएशन पार्टीला गेला होता. जाताना वडिलांची (विशाल अगरवाल) आलीशान कार घेऊन तो मुंढव्यातील कोझी रेस्टॉरंट मध्ये गेला . शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी कोझी रेस्टॉरंटमध्ये दारुची पार्टी केली.त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठराविक मित्र मेरीयाट सुट्स मधील ब्लॅक नावाच्या पब मध्ये गेले. वेदांत अगरवाल याने आणखी कोणत्या अमली पदार्थांचे सेवन केले होते का ? त्याची नार्को टेस्ट करण्यात आली का? दोन जणांचा जीव गेल्यानंतरही एफ आय आर मध्ये जामीन लवकर होईल अशी कलमे का दाखल करण्यात आली?
पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली?
या प्रकरणामुळे पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून आले .मुंढव्यातील कोझी रेस्टॉरंट आणि मेरीयाट सुट्समध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात असूनही कारवाई का झाली नाही? येथिल सीसीटीव्ही फुटेज तपासले तर भयानक चित्र समोर दिसेल.वेदांत अगरवाल प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. रात्री उशिरापर्यंत पब्स चालू ठेवणाऱ्या पब्स मालकांवर देखिल गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पुणे पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: