पिंपरी : कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण एके धनुष्यबाण'च चालवावे, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक काळेवाडी येथील 'रागा पॅलेस'मध्ये झाली. त्यावेळी पवार बोलत होते. बैठकीस भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पुनर्वसन व मदत खात्याचे मंत्री अनिल पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, सुनील शेळके, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, रिपब्लिकन पक्षा आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच अमित गोरखे, बापूसाहेब भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, भाऊ गुंड, निलेश तरस, राजेंद्र तरस आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी कोणाला कोठेही पाठवलेले नाही- अजितदादा
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार सांगतात, 'दादांनीच मला इकडे पाठवले आहे', पण ते साफ खोटे आहे. दादांनी कोणाला कोठेही पाठवलेले नाही. असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हलक्या कानाचे राहू नका. कितीही मैत्री अथवा नाते असले तरी निवडणुकीच्या काळात तरी विरोधी पक्षातील उमेदवाराला भेटू नका. ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेते पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी.
भारताने गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने प्रगती केली आहे, असे सांगून पवार म्हणाले की, विकासाची गॅरंटी म्हणजे काय हे मोदी यांनी दाखवून दिले आहे. देशात विकासाचे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील विकासाचे राजकारण करण्याची भूमिका आहे. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला.
'देशात विकासाची वज्रमूठ'
मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वज्रमूठ तयार झाली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे देश सुरक्षित वाटतो. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर नेण्याचे काम मोदी यांनी केले. भारताचे अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.
विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे खोटे नाटे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. नरेंद्र मोदी राज्य घटना बदलणार आहेत, नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, ही शेवटची निवडणूक आहे, यापुढे मोदींची हुकूमशाही राहील, अशी खोटी भीती निर्माण केली जात आहे. त्याला सडेतोड उत्तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.
राज्यघटनेतील दुरुस्ती देशहितासाठीच - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यघटनेत करण्यात आलेल्या दुरुस्त्या या देशहितासाठीच करण्यात आल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी यांना तीन चतुर्थांश बहुमताची म्हणजेच 400 खासदारांची आवश्यकता आहे. त्यांना ती ताकद देण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे. त्यासाठी नाराजी, रुसवे-फुगवे, मान-अपमान सर्व बाजूला ठेवून काम करावे.
प्रत्येक मतदारसंघात मोदी हेच उमेदवार - उदय सामंत
महायुती विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यांना सर्व मित्र पक्षांची साथ आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार कोणीही करू नये. प्रत्येक मतदारसंघात मोदी, शिंदे, फडणवीस व पवार हेच उमेदवार आहेत, असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
विकासकामे पाहून मत द्या - बारणे
खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रमुख विकास कामांचा आढावा सादर केला. पवना धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे, पुणे लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण, मेट्रोचा निगडी-किवळे-वाकड तसेच वाकड-नाशिक फाटा-चाकण असा मार्ग विस्तार, तळेगाव शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरण, देहूरोड ते वाकड उड्डाणपूल असे मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीत पासपोर्ट सेवा कार्यालय, बहुतांश रेल्वे स्थानकांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला मदत, कारला येथील एकविरा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा, वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी अशा अनेक कामांचा बारणे यांनी उल्लेख केला.
लक्ष्मणभाऊंचे नाव विरोधकांनी वापरू नये - शंकर जगताप
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप त्यांचे नाव व फोटो वापरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न थांबवावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला. 2019 च्या निवडणुकीपासून लक्ष्मणभाऊ महायुती बरोबर आहे. त्यांनी शेवटपर्यंत महायुती धर्माचे पालन केले. त्यांचा तोच वारसा आम्ही पुढे चालवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री अनिल पाटील तसेच बाळासाहेब पाटील, बाळा भेगडे, अश्विनी जगताप, सुनील शेळके, अजित गव्हाणे आदी नेत्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काही कार्यकर्त्यांनीही त्यांचे मनोगत मांडले. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका; मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार
Reviewed by ANN news network
on
४/०८/२०२४ ०९:५२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/०८/२०२४ ०९:५२:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: