गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !

 


हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया.   


गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
1 तिथी : युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा 
2 वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ? : याचा प्रथम उद्‍गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे.  आज   सर्वजण साजरा करत असलेल्या 1 जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व -

वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (10:35) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व -

रामाने वालीचा वध केल्याचा दिवस : रामाने वालीचा वध या दिवशी केला.

ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! : शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.

ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.

इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व - 

सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

1 गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक : गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !  : उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. – परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चित् दुःखमाप्नुयात् ॥

अर्थ : पृथ्वीवरील सर्व जीव सुखी आणि निरामय (रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण होवो. सर्वांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी शुभ आणि कल्याणमय असो आणि कोणाच्याही वाटेला दुःख न येवो.

तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्पाची, तो प्रत्यक्षात यावी; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करून म्हणूया,

‘ॐ शांति: शांति: शांति: ।’

- प्रा. विठ्ठल जाधव 


गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व ! गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व ! Reviewed by ANN news network on ४/०८/२०२४ ०९:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".