मुंबई : कस्टम्सच्या मुंबई विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी चार दिवसात कर चुकवून सोने भारतात आणण्याचा प्रयत्न करणार्याना अटक करून त्यांच्याकडून ९ किलो ४८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे.
कस्टम्सच्या विभाग III ने दिलेल्या माहितीनुसार १५ ते १८ एप्रिल या काळात १४ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हे सोने जप्त करण्यात आले आहे. याची किंमत ५ कोटी ७१ लाख रुपये इतकी होत आहे. हे सोने आणण्यासाठी प्रवाशांनी खास खिसे शिवलेली अंतर्वस्त्रे,कपडे आणि मोबाईल यांचा वापर केला होता. तर काहींनी सोन्याची पावडर मेणाच्या आवरणात बंद करून त्याची कॅप्सुल गुदाशयात ठेवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या तस्करी प्रकरणात काही विदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.
चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नैरोबी, अदिसअबाबा आणि पॅरिस येथून मुंबईला आलेल्या परदेशी नागरिकांना अडवण्यात आले. त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि शरीरावर १ किलो ६८१ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे वितळवलेले बार आणि कच्चे दागिने लपवून ठेवलेले आढळले. तर. दुबई येथून आलेल्या ४, अबुधाबी येथून आलेल्या ३, जेद्दा येथून आलेल्या २, बहारीन, कुवेत आणि जाकार्ता येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा १२ भारतीय नागरिकांना रोखून त्यांच्याकडून गुदाशय, अंगावर आणि अंतर्वस्त्रांच्या आत लपवून ठेवलेले ६ किलो ६२७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
अन्य एका प्रकरणात, विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंतर्वस्त्रात लपवून सोन्याची तस्करी करणार्या दोन भारतीय नागरिकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण १ किलो १७४ ग्रॅम पावडर स्वरूपातील सोने जप्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: