पुणे : राजस्थानातून विमानाने पुणे शहरात येऊन मॉलमधून महागडे कपडे आणि बूट चोरणार्या एका टोळीला बंडगार्डन पोलिसांनी ३१ मार्च रोजी अटक केली आहे.
गौरवकुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९, दोघेही रा. गणीपूर, जि. दौसा, राजस्थान), टोळीप्रमुख योगेशकुमार लक्ष्मी मीना (वय २५, रा. सुरोद, जि. करौली, राजस्थान) आणि सोनूकुमार बिहारीलाल. मीना (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गौरव आणि बलराम या आरोपींनी ३१ मार्च रोजी सायंकाळी संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयासमोरील मॉलमधून कपडे चोरले. यानंतर ते पळून जात होते. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. मॉलजवळील पेट्रोलपंपानजिक असलेल्या त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी कारमध्ये ब्रँडेड कंपनीचे कपडे, शूज आणि बेल्ट आढळून आले.
पोलिसांनी खडकी बाजार येथील हॉटेलमधून टोळीचा म्होरक्या योगेश मीणा याला ताब्यात घेतले. सोनू मीनाला तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वेस्थानकातून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान बंडगार्डन पोलिस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठ निरीक्षक संदिपान पवार, निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: