विरार : एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा गुन्हेशाखा युनिट १ च्या सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने ही कारवाई केली.
कैलास जयवंत टोकळे असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावावर विरार पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास कैलास टोकळेंकडे होता. त्यांनी १८ मार्च रोजी तक्रारदाराच्या भावाला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी १० लाख रुपये लाच मागितली. याची तक्रार अॅन्टीकरप्शन ब्युरो आल्यानंतर त्या अधिकार्यांनी तक्रारीची पडताळणी केली. मागितलेल्या लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये त्याच दिवशी स्वीकारण्याची तयारी टोकळे यांनी दर्शविली. अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने या प्रकरणी त्यांच्याविरोधात काशिमिरा पोलीसठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (सुधारणा सन २०१८) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अॅन्टीकरप्शन ब्युरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: