नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वरीष्ठ लिपिकावर लाचखोरीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाब श्रीधरराव मोरे, वय ५१ वर्षे राहणार रामनगर, कौठा, ता. नांदेड असे या लिपिकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात २७ मार्च रोजी रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी नांदेड ग्रामीण पोलीसठाण्यात २४८/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचा सेवानिवृत्त औषध निर्माता आहे. तेथील प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे व आरोपी गुलाब मोरे यांनी तक्रारदाराचे गटविमा योजनेचे बिल काढतो, परंतु यापूर्वी रजा रोखीकरणाच्या काढलेल्या बिलाचे बक्षिस म्हणून वीस हजार रुपये द्यावे लागतील नाही तर गटविमा योजनेचे बिल लवकर काढणार नाही असे म्हणून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नांदेड येथील अॅन्टीकरप्शन कार्यालयात तक्रार केली १ मार्च रोजी तक्रारदाराचे बिल जमा झाले. २ मार्च रोजी अॅन्टीकरप्शनच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. २७ मार्च रोजी अधिकार्यांनी तक्रारदाराला पंचांसोबत लाच देण्यासाठी गुलाब मोरे याच्याकडे पाठविले. परंतु त्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही.अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर नांदेड ग्रामीण पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: