पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षादलाच्या एका जवानाने धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात खाली पडून मृत्यूच्या दाढेत गेलेल्या एका प्रवाशाला डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बाहेर खेचून त्याचे प्राण वाचविले आहेत. दिगंबर देसाई असे या कर्तव्यदक्ष कर्मचार्याचे नाव आहे.
या घटनेविषयी रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी माहिती दिली.
२९ मार्च रोजी दिगंबर देसाई पुणे रेल्वेस्थानकावर आपली ड्यूटी बजावत होते. दुपारी १२ च्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेस आली. ती पुन्हा मार्गस्थ होत असताना एक प्रवासी धावत आला. तो गाडीत चढण्याच्या प्रयत्नात फलाट आणि गाडी या मधील जागेत पडला. हे पाहताच देसाई यांनी धावत तेथे जाऊन त्याला बाहेर खेचले. क्षणाचाही विलंब लागला असता तर त्या प्रवाशावा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला असता.
देसाई यांच्या या कृतीचे कौतुक त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेक प्रवाशांनी केले.
प्रवाशांनी धावत्या रेल्वेमध्ये चढू अथवा उतरू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: