पुणे : पुण्यातील चंदननगर पोलीसठाण्याच्या हद्दीत एका फर्निचर विक्रेत्याच्या नोकराने मालक घरात नसल्याची संधी साधून घरातील दीडलाख रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंदननगर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याला अटक केली.
मोडाराम भोमाराम काकड, वय २८, रा. हेमपुराखिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी तो फिर्यादीकडे कामास लागला होता. फिर्यादी घरात नसल्याचे पाहून त्याने कपाटातील लॅपटॉप व रोख रक्कम असा १ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. फिर्यादीच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने चंदननगर पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विलंब न लावता तपास सुरू केला. आरोपी रेल्वेने आपल्या मूळगावी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसपथक पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने गेले आणि आरोपी धावत्या रेल्वेत चढून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४ विजय मगर, सहायक आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ निरीक्षक मनीषा पाटील, निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शेगर, अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोणे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: