खेड: शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ४८ कोटी ३० लाख रुपयांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आमदार योगेश कदम यांना यश आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि ३० वर्षापूर्वीची जुनाट नळपाणी योजनेतील जलवाहिनीमुळे नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या यामुळे लवकरच मार्गी लागणार आहे.
शहरवासियांना सतावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी घेतलेल्या पुढाकाराला अखेर यश आले आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत ही नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या नवीन पाणी पुरवठा योजनेत जल शुध्दीकरण केंद्र, एकवीरा मंदिर परिसरात एक नवीन पाण्याची टाकी, सौर ऊर्जा निर्मिती केंद्र, एक्सप्रेस फिडर , नवीन जलवाहिन्या आणि योजनेअंतर्गत नादुरुस्त होणारे रस्ते दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे.
शहरातील शिवतररोड, दापोलीनाका, ब्राह्मणआळी, कासारआळी, समर्थनगर, महाडनाका परिसरातील रहीवाशांना वर्षानुवर्षे कमी दाबाच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते.
१५ दिवसांपूर्वीच शहरातील नगर परिषदेच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून प्रभाग ७ मधील भूखंडावर २ कोटी २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन बगीचा उभारण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच नव्या नळपाणी योजनेला मंजुरी मिळेल, असे वचन शहरवासियांना दिले होते. या आश्वासनाची आमदार योगेश कदम यांनी प्रत्यक्षात पूर्तताही केल्याने शहरवासियांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेतला असून शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटसाठीही निधी मंजूर झाला आहे. जगबुडी नदीमधील बोटिंग क्लब, क्रोकोडाईल उभारणीसाठीही आवश्यक सी.आर.झेड. परवानगी मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच शहराचे रूपडे पालटणार आहे.
या योजनेसाठी केंद्र शासनामार्फत अनुदान प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के, तर राज्य शासनामार्फत अनुदान प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के, तसेच नगरपरिषद चा ५ टक्के हिस्सा राहणार आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०५/२०२४ ०८:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: