सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या बल्गेरीयन जहाजावरील खलाशांची भारतीय नौदलाने केली सुटका, ३५ चाचे अटकेत




मुंबई : भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाता या नौकेने सोमालियन समुद्री चाच्यांनी अपहरण करून ओलीस ठेवलेल्या १७ खलाशांची सुटका करून ३५ चाच्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे.

चाच्यांनी जहाज आणि खलाशांच्या मुक्ततेसाठी जहाजमालक कंपनीकडे ६० दशलक्ष डॉलर्सची खंडणी मागितली होती.एडनच्या आखाताजवळून प्रवास करणार्‍या मालवाहू जहाजांचे अपहरण करून त्यातील खलाशांना ओलीस ठेवत खंडणी वसूल करण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने आंतरराष्ट्रीय करारानुसार भारताच्या नौदलाने या भागात गस्त घालत येथून ये जा करणार्‍या जहाजांना संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

१४ डिसेंबर २०२३ ते १६ मार्च २०२४ या काळात या भागातून एक्स रुएन हे बल्गेरीयन मालवाहू जहाज जात असताना त्याचे अपहरण सोमालियन चाच्यांनी केले. आणि त्यातील १७ खलाशांना ओलीस ठेवून जहाजमालक कंपनीकडे ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास सर्व खलाशांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.

भारतीय नौदलाची आयएनएस कोलकाता ही नौका या परिसरात गस्त घालत होती. तिला सूचना मिळताच या नौकेने सोमालियापासून २६० समुद्रीमैलावर असलेल्या  पोर्ट गराकॅड येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून सोमालियन चाच्यांच्या तावडीतून १७ खलाशांची मुक्तता केली. यावेळी चाच्यांनी भारतीय नौसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु नौसैनिकांनी जशासतसे उत्तर देत खलाशांची सुटका केली. एव्हढेच नव्हे तर, ३५ चाच्यांना अटक करून त्यांना पुधील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

चाच्यांनी या गुन्हयात वापरलेल्या ०२ बोटी, ०३ इंजिने, ०९ मोबाईल फोन, १९६ जिवंत काडतुसे, ०१ चाकू, ०१ कॅमेरा, ०१ सोमालियनपासपोर्ट, ०२ बल्गेरीयन पासपोर्ट, ओळखपत्रे व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून ती नौदलाने पोलिसांकडे सुपूर्द केली आहेत.

या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाणे येथे सोमालियन चाच्यांविरुद्ध १६ / २४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७, ३६४ (अ), ३६३, ३८४, ३५३, ३४१, ३४२, ३४४,(अ) १२०(ब), १४३, १४५, १४७, १४८, १४९, ४३८, ४२७, ५०६, ५०६ (२), ३४ सह मेरिटाईम अन्टी पायरसी अॅक्ट २०२२ कलम ३,५ सह अनलॉफुल अॅक्टीव्हीटी प्रिव्हेन्शन अॅक्ट कलम १६, २० आणि भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७  यासह पासपोर्ट अधिनियम कलम ३,६ तसेच परकीय नागरी कायदा कलम १४ अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या बल्गेरीयन जहाजावरील खलाशांची भारतीय नौदलाने केली सुटका, ३५ चाचे अटकेत सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या बल्गेरीयन जहाजावरील खलाशांची भारतीय नौदलाने केली सुटका, ३५ चाचे अटकेत Reviewed by ANN news network on ३/२४/२०२४ ०३:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".