एसटीचे ढिसाळ नियोजन,प्रवाशांमधून संताप....
दिलीप शिंदे
सोयगाव : चाळीसगाव आगाराची चाळीसगाव-बुलढाणा ही राज्य परिवहन महामंडळाची बस दि.२४ रविवारी सकाळी सोयगाव बसस्थानकावर खराब झाली.दुरुस्तीसाठी सोयगाव आगारात बस नेण्यात आली. यावेळी प्रवाशांना तब्बल तीन तास मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, चाळीसगाव येथून सोयगाव मार्गे बुलढाणा येथे जात असलेली बस क्रमांक एम.एच.१४ बीटी २३५७ ही सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सोयगाव येथील बसस्थानकावर खराब झाली होती.यावेळी चालक व वाहकाने सर्व पन्नास प्रवाशांना सोयगाव येथील बसस्थानकाजवळ उतरवून बस दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे सोयगाव येथील आगारात नेली होती. आगाराच्या तांत्रिक विभागाने बस दुरुस्त करून चालकाच्या ताब्यात दिली.बस आगारातून निघाली.आगरापासून दोनशे मीटर अंतरावर सोना नदी पुलावर पुन्हा खराब झाली.बस पुन्हा आगारात नेण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर बस दुरुस्त करण्यात आली. साडे अकरा वाजेच्या सुमारास सोयगाव बसस्थानकावरून बस बुलढाण्याकडे जाण्यास रवाना झाली. दरम्यान चालक व वाहकाने सोयगाव येथील बसस्थाकाजवळ सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास पन्नास प्रवाशांना उतरविले त्यात महिलांसह चिमुकले, व वयोवृद्धांचा समावेश होता. मात्र बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना आपल्या चिमुकल्यांची काळजी घेत सावलीची शोधाशोध करीत खाजगी वाहन व बस चा आधार घ्यावा लागला होता.
सोयगाव बसस्थानकावर प्रवाशांसाठी कोणतीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. बसची वाट पाहत वयोवृद्ध, महिलांसह चिमुकल्यांना तब्बल साडे तीन तास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला होता. मात्र सोयगाव आगाराकडून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करण्यात आल्याने प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला होता. तर सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी जिवंत नसल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: