'मोक्का'मध्ये 'वॉन्टेड' असलेल्या सराईताला पिंपरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
आरोपीकडे आढळले गावठी पिस्तूल
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एका सशस्त्र सराईत गुन्हेगाराला त्याच्यावर झडप घालून पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.
कृष्णा ऊर्फ बॉक्सर बाळू पारधे असे या सराईताचे नाव आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पारीत केले होते. मात्र, तेव्हा पासून तो पसार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात तरबेज आणि तितकाच निर्दयी, निर्ढावलेला असल्याने त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
तो पिंपरीतील एक्साईड बॅटरी कंपनीनजिक येणार असल्याची माहिती हवालदार शहाजी धायगुडे आणि दत्तात्रय निकम यांना मिळाली. हे दोघेही तेथे दबा धरून बसून राहिले. आरोपी त्या ठिकाणी येताच धायगुडे आणि निकम यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे आढळली.
यापूर्वीही पिंपरी पोलीसठाण्यात ३०६/२०२१ क्रमांकाने दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला धायगुडे आणि निकम यांनीच जेरबंद केले होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - १ स्वप्नागोरे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी अशोक कडलग, निरीक्षक, गुन्हे कापरे यांच्या अधिपत्याखाली सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे,उपनिरीक्षक शाकीर जिनेडी, हवालदार दत्तात्रयनिकम व शहाजी धायगुडे यांनी केली.त्यांना हवालदार दिपक महाजन, नूतन कोंडे यांनी विशेष सहाय्य केले. पुढील तपास उपनिरीक्षक बोकफोडे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: