मुंबई : कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला चिनमधून अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. काल २३ मार्च रोजी त्याला विमानाने भारतात आणण्यात आले.
त्याला प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी, सिध्दार्थ शेट्टी, सिद्धू , सिद, जॉनी अशा अनेक नावांनी ओळखले जात होते.
खंडणी विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग यांनी त्याला ताब्यात घेतले. विक्रोळी पोलीसठाण्यात २३० / २०१९ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०७, ४५२, १२०(ब) हत्यार कायदा कलम ३, २५, ५, २७ मोक्का कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
मागील वीस वर्षांहून अधिक काळ मुंबई परिसरात त्याची दहशत होती. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी स्थापन करून केले होते. सुरुवातीस तो कुख्यात गँगस्टर कुमार पिल्ले आणि त्यानंतर छोटा राजन यांचा टोळी सदस्य होता. कालांतराने त्याचे या दोघांशीही मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली. तोळीत भरती केलेल्या गुन्हेगारांमार्फत त्याने मुंबई ठाणे, नवी मुंबई परिसरात दहशत निर्माण करत गुन्ह्यांचे सत्र सुरू ठेवले होते.
विक्रोळीतील एका राजकीय पक्षाच्या नेत्याची हत्या करण्याच्या हेतूने त्याच्यावर केलेला गोळीबार आणि बॉलीवूडमध्ये वर्चस्व स्थापित करून तेथून खंडणी उकळण्याच्या हेतूने प्रसिद्ध निर्माता, कलाकारांना धमकावणे असे मोठे गुन्हेही त्याच्या नावावर आहेत.
२००४ साली त्याला एका गुन्ह्यात अटक झाली होती. २००५ साली जामीनावर सुटल्यावर तो देशाबाहेर पळून गेला. मात्र, आपल्या हस्तकांकरवी गुन्हे करणे त्याने सुरूच ठेवले. मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. २०१२ साली त्याच्याविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.
२०२३ पर्यंत तो आणि त्याच्या टोळीवर मोक्कासह ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली.
दरम्यान तो चीन आणि हाँगकाँग मध्ये रहात असल्याचे पोलिसांना समजले. २०२३ मध्ये पोलिसांनी चीनकडे त्याच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला.त्याचा सतत पाठपुरावा करून अखेर त्याला २३ मार्च रोजी रात्री बिजिंग, चीन येथून भारतात आणण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, उपआयुक्त (प्रतिबंधक) अमोघ गावकर,उपआयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त (डी - विशेष) दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक,निरीक्षक सुधीर जाधव, सुनील पवार, हवालदार महेश धादवड, मोहन सुर्वे, इंटरपोल समन्वय कर्यालयाचे निरीक्षक महेश पारकर, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -७, गुन्हे अन्वेषण विभाग यामधील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: