उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

 


पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न-अजित पवार

पुणे : राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,  असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, तहसीलदार संजय नागटिळक, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असतांना पोलीस दल विविध सण, उत्सव आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी ऊन, थंडी, पाऊस, सुट्टीची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सोबत त्यांचा परिवारांदेखील विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे असून त्याादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.

 पोलीस दलासाठी अत्याधुनिक पोलीस ठाणे, सुसज्ज निवासी वसाहती उभे करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  पर्यावरणाचा समतोल साधतांना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे जागेचे सपाटीकरण करुन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले. 

मंचर येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीकरीता ११ कोटी ५१ लाख रुपये, पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी ८१ लाख रुपये, घोडेगाव येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी रुपये  आणि जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीकरीता २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करुन  आंबेगाव परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत.

घोडेगाव येथील ४० खाटाचे ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २७ कोटी २३ लाख रुपये, बस स्थानक इमारत  पूर्णबांधणी करिता २ कोटी रुपये, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा प्रत्येकी ७ कोटी रुपये अशा सुमारे १२३ कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.

शासनाच्यावतीनेबेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. शेतकरीवर्गासोबत सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आणि बस स्थानक इमारत, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा कामांचे ई-भूमीपूजन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन Reviewed by ANN news network on ३/०४/२०२४ ०८:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".