सासवड येथे गुन्हा दाखल
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दी कार्यक्रमासाठी सासवड येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनपैकी एक कंट्रोल युनिट अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून यामुळे महसूल आणि पोलीसखात्यात एकच खळबळ माजली आहे. पुरंदरच्या नायब तहसीलदारांनी याबाबत सासवड पोलीसठाण्यात ५ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदविली आहे.
पुणे जिल्हयातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरीता उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे मुख्यालय सासवड येथे आहे. तेथील तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरुममध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमासाठी वापरावयाच्या ४० ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेले असल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यामुळे एकच गोंधळ माजला. शोध घेऊनही कंट्रोल युनिट न सापडल्याने हा प्रकार वरिष्ठांना कळविण्यात आला.
राज्य निवडणूक यंत्रणेने याची दखल घेत जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून अहवाल मागविला. त्यानंतर दि. ५ फेब्रुवारी रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुरंदरच्या नायब तहसीलदारांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: