मुंबई :अशोक चव्हाण, प्रा. मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे हे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार राज्याचे प्रश्न केंद्रीय स्तरावर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात श्री. बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खा.संजय काका पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने अशोक चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेऊन राज्यसभा उमेदवारी देत त्यांचा सन्मान केला आहे. प्रा. मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांनी पक्षाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे योगदान दिले आहे. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी अनेक वर्षे काम केले आहे. पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्या काम पहात आहेत. डॉ. गोपछडे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले आहे. या दोघांना उमेदवारी देऊन संघटनेसाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आदर करते हेच सिद्ध झाले आहे.
हे सर्व उमेदवार राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रश्न मांडतील. राज्याचे केंद्राच्या पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. हे तिघेही उत्कृष्ट खासदार म्हणून नावलौकिक प्राप्त करतील, असा मला विश्वास आहे,असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०७:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: