हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचे धैर्य अतुलनीय: ब्रिगेडियर सुनील बोधे
पुणे : 'शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन' तर्फे आज हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा , वीर पत्नींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .
ब्रिगेडियर सुनिल बोधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.माजी आमदार मेधा कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या
सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त २९ जानेवारी २०२४ रोजी,सायंकाळी ५ वाजता हा सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरुड येथे पार पडला. वीरपत्नींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.कॅप्टन स्वाती महाडीक यांची विशेष उपस्थिती होती.
हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी कॅप्टन स्वाती महाडिक,हुतात्मा लेफ्टनंट प्रकाश पाटील यांच्या पत्नी सुवर्णा पाटील, हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्या पत्नी अबोली मोहोरकर, हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, हुतात्मा मेजर जालिंदर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटिल यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
स्मृतिचिन्ह, साडी, श्रीफळ आणि मानधन देवून हा सन्मान करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना कॅप्टन स्वाती महाडिक म्हणाल्या,' पतीचे निधन हा अनपेक्षित धक्का असतो.आपले मन ते मान्य करीत नाही.आपली पुढची स्वप्ने एका क्षणात संपतात.पतीचे हौतात्म्य स्वीकारून पुढे जाणे ही अवघड प्रक्रिया असते. पतीचे स्वप्न आणि मुलांच्या भवितव्यासाठी मी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.
ब्रिगेडियर सुनील बोधे म्हणाले,' सीमेवर लढणाऱ्या सैनिका इतके त्यांच्या कुटुंबीयांचे धैर्य अतुलनीय असते.सैनिकांच्या वीर मरणानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी झाले पाहिजे. कारण त्या दुःखातून बाहेर येणे त्यांना खूप अवघड असते. या कुटुंबीयांना धीर देण्याचा शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन चा उपक्रम दिशादर्शक आहे'.
या वेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ' वीर पत्नीचे दुःख पाहून आपली संकटे काहीच वाटत नाहीत. भारतीयांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सैनिक प्राणाचे बलिदान देवून पार पाडतात. आपण दैनंदिन आयुष्यात ही जाणीव ठेवली पाहिजे'.
'सात रंग के सपने' हा मराठी -हिंदी गीतांचा विनामूल्य कार्यक्रम देखील या सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. हुतात्मा सुशांत गोडबोले यांना गाण्यांची आवड होती,त्यामुळे गाण्यांच्या कार्यक्रमाचा समावेश या सोहळ्यात करण्यात आला . 'निषाद,पुणे ' निर्मित गाण्यांचा कार्यक्रम चंद्रशेखर महामुनी आणि कल्याणी देशपांडे-जोशी यांनी सादर केला. 'अपनी आज़ादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं ,सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं', शूर आम्ही सरदार अशा गीतांना चांगला प्रतिसाद मिळाला.
शरदचंद्र पाटणकर, शुभांगी पाटणकर,मेजर महेश तुंगार,अभय शास्त्री, सुजय गोडबोले, रामदास काकडे, सुशील फिरोदिया, दीपक शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन' च्या वतीने सुशांत यांच्या मातोश्री श्रीमती गीता गोडबोले यांनी प्रास्ताविक केले.
निवेदन पल्लवी देशमुख यांनी केले. फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सतीश राजहंस यांनी आभार मानले.
कॅप्टन सुशांत गोडबोले यांना २९ जानेवारी २००३ जम्मू येथे 'ऑपरेशन पराक्रम' दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची आई गीता गोडबोले यांनी शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनची स्थापना केली . फाऊंडेशनतर्फे वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ०८:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: