विशेष लेख : कार्तिक मासाचे महत्व

 



उठा उठा हो सकळीक आधी स्मरावा गजमुख ….


या सात्विक स्वरांनी प्रसन्न पहाट होते, तो महिना म्हणजे कार्तिक महिना. हिवाळ्याच्या थंडीमुळे शरीर आणि मनावर असलेली शिथिलता या भुपाळ्यांमुळे दूर होते. आपल्यात ऊर्जा निर्माण होऊन प्रसन्न चित्ताने, उत्साहाने दिवसाचा आरंभ होतो. साधना वृध्दी करणारा, आरोग्य प्रदान करणारा, सामाजिक ऐक्य निर्माण करणारा हा महिना आहे. ईश्वरी कृपा मिळवण्यासाठी कार्तिक महिना अतिशय अनुकूल असतो असे वर्णन स्कंद पुराण, नारद पुराण आणि पद्म पुराणातही केले आहे. कल्याणकारी कार्तिक महिन्या विषयीची उपयुक्त माहिती या लेखात दिली. 


श्री कृष्णाला प्रिय कार्तिक मास


कार्तिक मास म्हणजे चातुर्मासातील अखेरचा महिना.  नारायणाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानी नारद मुनींना आणि नारद मुनींनी महाराज पृथुला कार्तिक महिन्याचे महत्त्व सांगितले. कार्तिक महिन्यात भगवान विष्णुंची पूजा, प्रात:काळी स्नान, तुळशी पूजा, उद्यापन आणि दीपदान यांना विशेष महत्व आहे. स्कंदपुराणानुसार श्रीकृष्ण स्वतः सांगतात वनस्पतीमध्ये तुळस, व्रतांमध्ये एकादशीचे व्रत आणि महिन्यांमध्ये कार्तिक मास मला अत्यंत प्रिय आहे. 


ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करण्याचे महत्व !


  शरद पौर्णिमेपासून  कार्तिक पौर्णिमेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे असे शास्त्र सांगते. नदीवर जाणे शक्य नसल्यास घरीच गंगा आणि अन्य नद्यांचे स्मरण करून, त्यांना आवाहन करून नदीत स्नान करीत आहोत, असा भाव ठेवून स्नान करावे. हिवाळा सुरू झाल्याने स्नानासाठी साबण न वापरता तेल मिश्रित चण्याचे पीठ किंवा उटणे वापरावे. उटणे लावल्याने चरबी न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्थूल माणसांनी उटणे वापरणे लाभदायक आहे.

  ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने डोळ्याचे विकार होत नाही, हवेतील शुद्ध प्राणवायू मिळतो, शरीरातील अपानवायूचे कार्य सुलभतेने होते, स्मरणशक्ती वाढते, इतर शक्ती केंद्रे जागृत होतात, शरीरशुद्धी होते आणि सप्तचक्रे जागृत होऊन साधना वृध्दी होते असे अनेक लाभ होतात.

  हल्ली घर, कार्यालय, शाळा वातानुकूलित असतात. यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी अनेक त्वचारोग आणि 'ड' जीवन सत्वाच्या कमतेरतेमुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान केल्याने कोवळ्या उन्हाचे सुद्धा उपाय होतात. रोग मुक्तीचा मार्ग मिळतो.


बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)


ईश्‍वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बळी राजाची आठवण म्हणून बलीप्रतिपदेला त्याची पूजा करतात. तो राक्षस कुळात जन्माला असला तरीही सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरी कृपा यांमुुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे बळी राजाच्या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्‍याचा दाससुद्धा होण्याची सिध्दता ठेवतो.


हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. तसेच ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून हा दिवस साजरा करतात.या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.औक्षण केल्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.


गोवर्धनपूजा


कार्तिक प्रतिपदेला गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्‍या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. निसर्गाशी जवळीक होऊन निसर्गाप्रती कृतज्ञता भाव वाढतो.



भाऊबीज


जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी धर्मशास्त्राने भावा-बहिणीचे नाते जोपासण्यावर विशेष भर दिलेला आहे. पुरुषाच्या मनात स्त्रीप्रती शुद्धभाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हाच या मागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावर असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील प्रेम पवित्र असते. या प्रेमाची देवाण-घेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात.


अलीकडच्या काळात कित्येक भगिनींवर बलात्कार होत आहेत, कित्येकींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. एकतर्फी प्रेमातून कित्येकींची उघड उघड हत्याही होते. समाजाच्या प्रेतवत्, म्हणजे क्षात्रधर्महीन मानसिकतेचे हे प्रतीक आहे. स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे.याचबरोबर भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रशिक्षित करणे हि काळाची गरज आहे. हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल. 


पांडव पंचमी

यालाच ‘ज्ञानपंचमी’, ‘लाभपंचमी’ आणि ‘कडपंचमी’, अशी नावे आहेत. पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, ‘कधीनाकधी हा इहलोक सोडावाच लागतो’; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले. तो दिवस कार्तिक शुद्ध पंचमीचा होता; म्हणून त्याला ‘पांडव पंचमी’ म्हणतात. ‘देहाला विराम हा कधी ना कधीतरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात. दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असेही म्हणतात.


      

आवळे किंवा अक्षया नवमी

कार्तिक नवमीला आवळा किंवा अक्षया नवमी साजरी केली जाते.  भगवान श्रीकृष्ण वृंदावन-गोकुळ सोडून आवळा नवमीच्या दिवशी मथुरेला रवाना झाले होते. त्यामुळेच आवळा नवमीच्या दिवसापासून वृंदावन परिक्रमा करण्यात येते.

 नवमी तिथीपासून पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळा वृक्षाखाली निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, एकदा देवी लक्ष्मीच्या मनात नारायण आणि भगवान शिव यांची पूजा करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर त्या विचार करत होत्या की दोघांची एकत्र पूजा कशी करता येईल. तेव्हा भगवान नारायण यांनी सांगितले की, तुळशी आणि बेलाची गुणवत्ता असलेल्या आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने या दोन्हींची पूजा केल्याचे शुभ फळ प्राप्त होते.

  आवळ्याला धात्री म्हणजेच आईसारखे पोषण करणारी असे देखील म्हणतात. आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात. आमला एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला आवळा अर्पण करतात. आवळ्याच्या वृक्षाचे पूजन करून सगळे एकत्र येऊन आवळीच्या झाडाखाली भोजन करतात. 

 आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार ‘पित्त, बद्धकोष्ठता, केस गळणे, अकाली केस पिकणे, त्वचारोग, जीवनसत्व ‘सी’ची कमतरता’ यांवर रामबाण उपाय, म्हणजे आवळ्याचे सेवन करणे.


कार्तिकी एकादशी

या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळस वहातात. ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दर्शवण्यासाठी असे करतात. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूचे तत्व, तसेच तुळशीमध्ये शिवाची तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वहातात.

हल्ली अनेक जण आपापल्या संप्रदाया नुसार कार्य करीत आहेत परंतू याला मर्यादा असतात.आज हिंदु म्हणून एकत्र येऊन समाज सहाय्य आणि राष्ट्र रक्षण,धर्मजागृती  करण्याची गरज आहे. ‘हरि आणि हर’ भेट म्हणजे सामाजिक ऐक्य शिकवणारा दिवस आहे.


देव-देवतांची दिवाळी

हिंदु कालगणने नुसार कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही देव दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही आख्यायिका आहे.

या दिवसात बाळकृष्ण आणि तुळशीचा विवाह करतात.

त्यानंतर लग्नाचे मुहूर्त निश्चित केले जातात लागतात. या महिन्यात तुळशीची लागवड करतात.

कार्तिक पौर्णिमेला  दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो.देव दीपावलीच्या दिवशी वाराणसीत गंगेच्या तीरावर लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. पुण्य संचय करण्यासाठी  या दिवशी गंगा नदीत स्नान करतात आणि संध्याकाळी नदीत दीपदान करतात. तेव्हा जणू सर्व देवता आकाशातून पृथ्वीवर अवतरल्या आहेत असा भास निर्माण होतो. या दिवशी वाराणसीचे सर्व घाट दिव्यांनी उजळून निघतात.हे रम्य दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक वाराणसीला येतात.

देव दीपावळीला 'त्रिपुरारी पौर्णिमा' असेही म्हणतात. कारण प्राचीन काळी भगवान शिवाने या तिथीला त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याचे प्रतीक म्हणून त्रिपुर जाळून काकडा लावून आरती करतात.

देव दीपावलीचा संबंध केवळ भगवान शिव यांच्यासोबत नसून भगवान विष्णूशीही आहे. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता.

या दिवशी भगवान कृष्णाने दिव्य रासलीला केली होती अशी आख्यायिका आहे. या शुभ दिवशी रासलीला कार्यक्रम आयोजित केले जातात. या उत्सवासाठी जगन्नाथ मंदिर, पुरी आणि इतर सर्व राधाकृष्ण मंदिरांमध्ये, संपूर्ण कार्तिक महिन्यात पवित्र व्रत पाळले जाते. भगवंताची निस्सीम भक्ती करून त्याच्याशी एकरूप होता येत, असे शिकवणारी रासलीला आहे.


कल्याणकारी कार्तिक मास

असा हा  निरनिराळ्या व्रताच्या माध्यमातून आरोग्याला जपणारा; आवळी भोजन आणि हरी-हर भेटीतून सामाजिक ऐक्य शिकवणारा; आयुर्वेदाचे महत्व सांगणार; गोवर्धन पूजन, तुळशी पूजन आणि आवळी पूजन यातून निसर्गावर प्रीती करायला शिकवणारा; बळी राजाच्या उदाहरणातून सत्पात्री दानाचे आणि भक्तीचे महत्व शिकवणारा, समाज आणि निसर्ग यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवणारा, असा हा कल्याणकारी कार्तिक मास आहे याचा सर्वांनी लाभ करून घेऊया  . 



- प्रा. विठ्ठल जाधव

विशेष लेख : कार्तिक मासाचे महत्व विशेष लेख : कार्तिक मासाचे महत्व Reviewed by ANN news network on ११/१३/२०२३ ०५:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".