भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित 'कथा कीर्तन महोत्सवा' चे उद्घाटन


भारतीय विद्या भवन इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करताना डावीकडून लीना मेहेंदळे,इन्फोसिस  चे उपाध्यक्ष सुश्रुत वैद्य, नागलक्ष्मी राव, नंदकुमार काकिर्डे,डॉ.सदानंद मोरे, डॉ.गो.बं.देगलूरकर

२७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान पुण्यात आयोजन

पुणे: महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या  कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सव चे उद्घाटन दि २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाले.

या कीर्तन   महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसचे उपाध्यक्ष सुश्रुत वैद्य,  ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर, संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे ,  भारतीय विद्या भवन बंगळूरु केंद्राच्या  सहसंचालक नागलक्ष्मी राव,भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या  अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे,मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत झाले.

भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा उद्घाटन सोहळा पारंपारिक उत्साहात पार पडला.


 भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष  संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने(विठ्ठल रुक्मिणी कथा) प्रारंभ  झाला.

दि. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य 'कथा कीर्तन महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे. 


 यावेळी बोलताना    सुश्रुत वैद्य म्हणाले, 'माणसाच्या जीवनाला चरितार्थाच्या पलीकडे अर्थ देण्याचे काम कीर्तन माध्यमातून केले जाते. महाराष्ट्राला कीर्तन प्रबोधनाची मोठी परंपरा आहे.म्हणुन या कीर्तन महोत्सवाला प्रोत्साहन देण्याचे काम इन्फोसिस फाऊंडेशनने केले आहे. मानवी जीवनाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात योगदान इन्फोसिस फाउंडेशन च्या वतीने केले जात आहे.कीर्तन महोत्सवातून या सर्व उपक्रमांना बळ मिळेल'.

 डॉ.गो. बं.देगलूरकर म्हणाले, 'शैक्षणिक संस्थेत कीर्तन, वारकरी परंपरेचा उपक्रम चालतो आहे , ही कौतुकाची बाब आहे. ब्रम्हानंद मिळावा हा कीर्तनाचा उद्देश असतो. नीती कल्पनांवर आधारित संत कार्य सर्वांसमोर ठेवणे हा कीर्तनाचा उद्देश असतो. कीर्तनाला तरुण पिढी येते , ही देखील चांगली गोष्ट आहे. भारतीय तत्त्वज्ञान चा सखोल अभ्यास कीर्तनकारांनी केलेला असतो. त्यातून अमृतानुभव आपण घेतला पाहिजे. '

डॉ सदानंद मोरे म्हणाले,' आपली संस्कृती घडविण्यामध्ये आणि टिकविण्यामध्ये कीर्तनाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा वर्धिष्णू होत राहिले पाहिजे.इहलोकाचे रूपांतर वैकुंठामध्ये करण्याचे सामर्थ्य कीर्तनात आहे '.

भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नाग लक्ष्मी राव यांनीही मनोगत व्यक्त केले. लीना मेहेंदळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले.

 सप्ताह भर कथा कीर्तन

 मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांचे  पारंपरिक वारकरी कीर्तन(भक्त प्रल्हाद कथा )  होणार आहे. बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन स्वर मंजुषा श्रीमती अंजली कऱ्हाडकर  व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर  या माय - लेकींच्या "कीर्तन संवादाद्वारे " (पुरंदर दास कथा )तिसऱ्या  दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे. गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद  श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या  नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र  श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे  पती-पत्नीच्या " कीर्तन जुगलबंदीने" गुंफले जाणार  आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २  डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ  कीर्तनकार चारुदत्त  आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.

महोत्सवाच्या  अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०  ते १२ दरम्यान " कीर्तन परंपरा - काल, आज व उद्या" या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यम तज्ञ  प्रा.डॉ. विश्राम ढोले,  तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व  संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता  कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे  "महाभारतातील किर्तन परंपरा"  यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर  ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा  रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे. 

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे. 
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित 'कथा कीर्तन महोत्सवा' चे उद्घाटन भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित   'कथा कीर्तन महोत्सवा' चे उद्घाटन Reviewed by ANN news network on ११/२७/२०२३ ०७:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".