पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने दोन अट्टल घरफ़ोड्यांना मोठ्या शिताफ़ीने तपास करून अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ७ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले आहे. यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर रा. वाघोली (गौर) ता. कळंब जि. धाराशिव आणि राहूल उर्फ लल्या हिरामण लष्करे रा. गौसिया मस्जिदजवळ, काळाखडक झोपडपटी, वाकड, पुणे अशी या आरोपींची नावे आहेत.
२६/०८/२०२३ रोजी काटे इस्टेट, चोविसावाडी, च-होली, दिघी परिसरामध्ये एकाचवेळी ६ घरफ़ोड्या झाल्या होत्या. याचा तपास करताना वरील दोन्ही आरोपींनी या घरफ़ोड्या केल्याचे पोलिसांना समजले. राहुल लष्करे याला यापूर्वीच तडीपार करण्यात आले होते. असे असूनही दोन्ही आरोपी या परिसरात चोरी करून पसार होत होते. ते निगडी परिसरात आले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी दिघी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले २ घरफोडी चोरीचे गुन्हे तसेच चिंचवड, लोणीकंद, शिरवळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले गुन्हे असे एकूण ५ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून ९ तोळे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, दुचाकी वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखेचे देवा राऊत, अंमलदार शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, देवा राऊत, कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२३ ०५:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: