पिंपरी : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेत प्रदीप जांभळे-पाटील यांची पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत.
महापालिकेत शासनाकडून आलेल्या स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. तथापि येथील राजकीय नेत्यांचे त्यांच्याशी बिनसले होते. त्यामुळे त्यांच्या हाती अतिरिक्त आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी दहा दिवस त्यांना रूजू करून घेतले नव्हते. २२ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाने झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदीप जांभळे पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. याला झगडे यांनी प्रशासकीय लवादामध्ये आव्हान दिले होते. त्यावर लवादाने जांभळे यांची यांची पात्रता पुन्हा तपासावी, असे निर्देश शासनाला दिले होते. त्यानुसार पात्रता पुन्हा तपासण्यात आली. आता सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जांभळे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आली आहे.
झगडे यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध झगडूनही या लढ्यात यश मिळाले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: