मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

 

मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट; अधिकारी आणि कंत्राटदारला घेतले फैलावर

मुंबई : स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्ली बोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी तेथील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ आज गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री श्री. शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली आणि तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी केली. महापालिका अधिकाऱ्यांना यापूर्वीच निर्देश देऊन दिवसातून पाच वेळा साफसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी या वसाहतीमधील शौचालयाची आणि त्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्याठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे निदर्शनास आले. मुंबईतील प्रमुख ठिकाणांसोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या आणि शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्याचे निर्देश दिले आहेत त्याची प्रभावी अमंलबजावणी झाली पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले. 

स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, पालिकेच्या खर्चाने त्याची दुरुस्ती, डागडुजी करावी आणि तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्री. चहल यांना  दिले.

आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट्य आहे ते साध्य होऊ शकेल. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एका महिन्याचा वेळ देत या परिसरातील स्वच्छता, डागडुजी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 



मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश Reviewed by ANN news network on १०/०१/२०२३ ०४:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".