मराठी मुस्लिमांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृती कार्यक्रम आखणार
पुणे : मराठी मुस्लिम सेवा संघ मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन 'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी'चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले.अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेचे प्रमुख डॉ.जहीर काझी,माजी खासदार अनंत गीते,भाजप प्रवक्ते माधव भांडारी,मनसेचे अरविंद गावडे,मराठी मुस्लिम सेवा संघचे अध्यक्ष फकीर महमद ठाकूर,हाजी इब्राहिम शेख उपस्थित होते.
मराठी मुस्लिम सेवा संघ ही राज्यातील मराठी मुस्लिम स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था आहे.मराठी मुस्लिमांची स्वतंत्र ओळख असून ती दृढ करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात विस्तार करून ५ लाख नोंदणी करणार असल्याचे फकीर महमद ठाकूर यांनी सांगितले.
मराठी मुस्लिमांचे नेतृत्व पुढे यावे,स्थानिक मुस्लिमांना वाव मिळावा,यासाठी कृती योजना आखली आहे. राजकीय पक्षांनीही हा दृष्टिकोन ठेवून काम करावे,असे आवाहन करण्यात आले. 'माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्यानंतर मराठी मुस्लिम नेतृत्व तयार झाले नाही,ते तयार झाले पाहिजे ,अशी भावना फकीर महमद ठाकूर यांनी व्यक्त केली.
'मराठी अल्पसंख्य समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीचे आव्हान संस्थेने उचलावे ,त्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करावा,असे आवाहन डॉ पी ए इनामदार यांनी केले. शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय सर्व आघाड्यांवर प्रगतीस वाव आहे. मात्र,त्याची सुरवात शैक्षणिक प्रगतीने होते.सामाजिक कार्य करणाऱ्यांची उणीव सर्वच समाजात भासत असून या क्षेत्रात मराठी मुस्लिमांनी अधिक योगदान द्यावे.आपला पाया बळकट असेल तरच आपण आपली अस्मिता पुढे नेऊ शकतो.त्यासाठी नेतृत्व विकसनाचा कार्यक्रम जाणीवपूर्वक आखला पाहिजे.मराठी मुस्लिम सेवा संघाच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी मदत करू',असेही ते म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२३ ०३:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: