पूजा,भोजनासह संस्कृती प्रतिष्ठानकडून यथोचित आयोजन
उत्तम सामाजिक कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रण
पुणे : अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त पुण्यातील परंपरा जपणाऱ्या संस्कृती प्रतिष्ठान आणि बोधनी परिवाराकडून ३३ मेहुणांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूजा,भोजनासह यथोचित आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार,दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते दीड या वेळेत हा पारंपरिक कार्यक्रम अश्वमेध कार्यालय ,कर्वे रस्ता येथे होणार आहे. संस्कृती प्रतिष्ठान आणि बोधनी परिवाराच्या वतीने संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
'अधिक मासात जावयाला भोजन आणि भेटवस्तू,दान देण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यात अनोखी भर टाकण्यासाठी समाजात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा घाट घातला आहे',असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. या दांपत्यांना दीपदान देखील करण्यात येणार आहे.
या गौरव कार्यक्रमाला निवृत्त एअर व्हाइस मार्शल पी. एल. पुरोहित, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, प्रा. अनिरुद्ध देशपांडे ( बी. एम. सी. सी.) ,प्रा. विकास मठकरी, पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर ,पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार काकिर्डे , मुंबई दूरदर्शनचे निवृत्त ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण काकतकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२३ ११:४७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: