पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सीमा देव यांचे पती रमेश देव यांचे निधन झाले होते. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ या १९६१ मध्ये झळकलेल्या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. १९७१ मध्ये रिलीज झालेल्या आनंद, कोशिश आणि सरस्वतीचंद्र चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. शिवाय यंदा कर्तव्य आहे, माझी आई, सुवासिनी, सोनियाची पावले, मोलकरीण यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. सुहासिनी, हा माझा मार्ग एकला, पाहू रे किती वाट, अपराध, या सुखांनो या या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या 'पाहू रे किती वाट' या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा देव यांना मिळाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली
'चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहीले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. गेल्यावर्षी, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी आज, सीमा देव यांचं झालेलं निधन ही देशभरातील चित्रपटरसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. या जोडीकडे पाहत मागच्या पिढ्यातील अनेक दांपत्यांनी आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न केला. सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतील कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ ०१:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: