पुणे : पंकजा मुंडे यांच्या भाजपमधील असंतोषाची सातत्याने चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला. "मी भाजपची आहे, पण भाजप माझी थोडीच आहे..." असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात केले. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये अल्प चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांनी दोन वेळा दिल्लीला भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीपासून फारकत घेत अजित पवार यांनी आठ सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने पंकजा मुंडे राज्यात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे काय भूमिका जाहीर करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: