पिंपरी : उसने दिलेले ३० लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून एका ७० वर्षीय वृद्धाची हत्या करून मृतदेह पुण्यातील ताम्हिणी घाटात फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रणजीत मेला सिंग वय ७० असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हत्येचा सूत्रधार नारायण इंगळे, राजेश नारायण पवार आणि साधन ज्ञानोबा मस्के अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण इंगळे हा पंजाब सिंध बँकेत व्यवस्थापक होता. काही दिवसांपूर्वी तो त्या पदावरून निवृत्त झाला. त्याने रणजित मेला सिंग यांच्याकडून तीस लाख रुपये उसने घेतले होते. रणजित मेला सिंग नारायण याच्याकडे पैसे परत मागत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. नारायण इंगळे याला पैसे परत करायचे नव्हते. त्यामुळे त्याने आरोपी राजेश नारायण पवार आणि साधन ज्ञानोबा मस्के यांना रणजितचा खून करण्यासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली.
पैसे परत करण्यासाठी नारायण इंगळे याने १९ एप्रिल रोजी रणजित मेला सिंह यांना चिंचवड येथील राहत्या घरी बोलावले. तेथे त्यांचा दोरीने गळा आवळून आणि चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा मृतदेह गाडीने ताम्हिणी घाटात नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली.
रणजित मेला सिंग बेपत्ता असल्याची तक्रार चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या दिशेने चिंचवड पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट 2 समांतर तपास करत होते. आरोपी चिखली परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२३ १२:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: