पुणे : ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीला लागून नदीपात्राजवळ असलेल्या कै.गंगा धर केळकर यांच्या समाधी परिसराचा, गुरे बांधून गोठ्यासारखा वापर सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.समाधी स्थळाचा चुकीचा वापर करून मूळ रूप आणि भावना बदलू नये असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी केले आहे. १९२८ साली ही समाधी बांधली गेली असून ती समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे.
स्थानिक परिसरातील काही जण समाधीच्या शेडमध्ये गुरे बांधून त्यांच्या चारा-पाण्याच्या सोयीसह वापर करून समाधी परिसराचा गोठा करीत असल्याचे केळकर कुटुंबियांच्या निदर्शनास आले.हे पाहून गंगाधर केळकर यांचे नातू ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी आज या समाधीला भेट देऊन पाहणी केली. आणि गोठ्यासारखा वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिकेने संबंधितांवर कारवाई केली पाहिजे,अशी मागणी केली.
समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मक रित्या पिंड(शिवलिंग) बसवलेले आहे.पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत.नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले .
पुण्यात समाधी स्थळाचा होतोय गोठा !
Reviewed by ANN news network
on
७/०७/२०२३ ११:५३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: