मुंबई : नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट पूर्वनियोजित आहे. मात्र, या बैठकीत काय चर्चा होणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे, या प्रस्तावाने सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, महाराष्ट्राच्या राजकीय चित्रात बदल घडण्याची अपेक्षा आहे. राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून काय साध्य होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यापूर्वी ‘या चिमण्यांनो परत फ़िरा रे’, अशी साद शिंदे गटाला घातली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ हे वक्तव्य करण्यात आले होते. मात्र आता शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाशी हातमिळवणी करणार का? या प्रश्नाला महत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी होत आहेत. ठाकरे गटाच्या निलम गोर्हे यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याआधी मनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. या सर्व राजकीय घडामोडींचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: