पिंपरी : चिखली पोलिसांनी पूर्णानगर, चिंचवड येथे १० जुलै रोजी रात्री बांधकामस्थळावरून भंगार चोरणा-या तिघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता ते वाहनचोरीचाही साईड बिझनेस करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या त्रिकुटाकडून ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिगंबर काशिनाथ जामदारे, वय १९ वर्षे, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे.प्रतिक गुलाब गोडसे, वय २० वर्षे, रा. घरकुल, चिखली, पुणे.वैभव संजय कापरे, वय १९ वर्षे, रा. नेवाळेवस्ती, चिखली, पुणे अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
10 जुलै रोजी रात्री चिखली पोलीस ठाण्याचे पथक आपल्या हद्दीत गस्त घालत असताना पूर्णा नगर चिंचवड येथे विवेस्टा सोसायटीच्या कन्स्ट्रक्शन साईट जवळून तीन व्यक्ती दोन ऑटोरिक्षामध्ये काही साहित्य भरत असल्याचे त्यांना दिसून आले. ही हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली त्यावेळी ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने दोन पंचांसमक्ष त्यांच्या ऑटोरिक्षांची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये लोखंडी भंगार आढळून आले. पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते वाहनचोरीही करत असल्याचे उघड्कीस आले त्यांच्याकडून तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण रक्कम चार लाख तीस हजार इतकी होत आहे.
ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षकज्ञानेश्वर काटकर, निरीक्षक गुन्हे राजेंद्र बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश गुमाने, हवालदार साकोरे, सावंत, शिंदे, नाईक, राठोड, सुतार, पिंजारी, गायकवाड यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: