नाशिक : सप्तश्रृंगी गडावरून दर्शन घेऊन परत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जाणारी एसटी बस १२ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन दरीत कोसळली.या अपघातात एकजण ठार झाला असून, २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून, गडावरील ४ प्रवासी असल्याची माहिती आहे. बस क्रमांक (MH 40 AQ 6259) रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसचे चालक गजानन टपके, आणि वाहक पुरुषोत्तम टिकार होते. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्तांची गैरसोय होणार नाही, यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून, मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. असे पालकमंत्री भुसे यांनी म्हटले आहे.
जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: