मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. खातेवाटपावरून शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्यात एकवाक्यता होता होता पुन्हा बिनसले आहे. त्यामुळे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीसही निघाले आहेत.
या विषयावर काल ११ जुलै रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी या तिन्ही नेत्यांची बैठक झाली होती. बैठकीला प्रफ़ुल्ल पटेलही उपस्थित होते. पवार गटाला अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक ही मंत्रिपदे हवी आहेत. बाकी बाबतीत फ़ार मतभेद नसले तरी; अर्थमंत्रीपद अजित पवार यांना द्यायला शिंदेगट राजी नाही. त्यांच्या काही आमदारांना अजित पवार निधी रोखून आपली गळचेपी करतील अशी भिती वाटत आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीत याचा तोडगा निघाला आणि त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आज काही महत्वाची घोषणा करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूअसतानाच आता अजित पवार दिल्लीस रवाना झाले असल्याने आता दिल्ली दरबारी अमित शहाच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील असे दिसत आहे. या मुळे शिंदे, फ़डणवीसही दिल्लीला जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: