मुंबई : शिवसेनेची घट्ना मिळाल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे गटात ४० तर उद्धव यांच्यासोबत १४ आमदार आहेत. दोन्ही पक्षांना युक्तिवाद करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेऊ, असे राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. अखेर निवडणूक आयोगाने विधानसभाध्यक्षांना घटनेची प्रत पुरविली आहे. शिवसेनेच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल.
शिवसेना आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकमेकांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केली आहे. आता याप्रकरणी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी आमदारांना पुराव्यासह प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने नुकतीच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश सभापतींना द्यावेत, अशी मागणी केली होती. आमदार सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य १५ जणांविरोधात मुख्य व्हीप म्हणून अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिलेल्या निकालात सभापतींना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीस उशीर करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: