पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत

मुंबई  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे वंदेभारत एक्स्प्रेसचे स्वागत करतील.  

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.

उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणारी वंदेभारत एक्स्प्रेस ५ जून २०२३ पासून नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.

  चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उदघाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.

 मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालील प्रमाणे :  

मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई). 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या  मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ Reviewed by ANN news network on ६/०२/२०२३ १०:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".