ओडिशा : चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांच्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओडिशातील बहनगा स्टेशनजवळ अपघात झाला असून हे वृत्त हाती आले तेव्हा या अपघातात सुमारे ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. तर, १३२ जखमींना मेडिकल कॉलेज, बालासोर येथे हलवण्यात आले होते.
चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस ही चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधील हावड्यापर्यंत धावते. शालिमार स्थानकावरून दुपारी ३.१५ च्या सुमारास निघालेली ही गाडी ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली. आणि दुस-या रुलावरून जाणा-या मालगाडीची तिला धडक बसली. या धडकेमुळे गाडीच्याब रुळावर असलेल्या बोगी घसरल्या. त्यामुळे अपघाताची गंभीरता वाढली. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी संपर्कात आहोत. आमचा आपत्कालिन नियंत्रण कक्ष सक्रीय केला असून त्याचे क्रमांक 033- 22143526/ 22535185 असे आहेत अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
- ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेने दुःखी असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.
- या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी यांनीदेखील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यूची माहिती कळताच अतीव दु:ख झाले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले.
- घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नियंत्रण कक्षात पोहोचले. ते म्हणाले की, या भीषण रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा मी नुकताच आढावा घेतला आहे. उद्या सकाळी, शनिवारी घटनास्थळी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री पटनायक यांनी म्हटले.
- ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. 600-700 बचाव दलाचे जवान काम करत आहेत. रात्रभर बचावकार्य सुरू राहणार आहे. सर्व रुग्णालये सहकार्य करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: