जळगाव : जळगावातील कालिमामंदिरानजिक असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर १ जून रोजी सकाळी दोन सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोड्यात बँकेतील एक कर्मचारी सहभागी असल्याचे पोलिसांना आढळून आले असून त्याने दिलेल्या कबुलीवरून दरोडेखोर कोण आहेत याचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी झाले असल्याचे वृत्त आहे.
लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती पोलीस देणार आहेत.
१ जून रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा दरोडा घालण्यात आला, हेल्मेट घालून दोन दरोडेखोर बँकेत घुसले. त्यांनी बँक मॅनेजर राहुल महाजन यांच्याकडे लॉकरच्या किल्ल्या मागितल्या. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकूने त्यांच्या मांडीवर वार केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्या देखील बोटाला दुखापत केली. त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी लॉकरमधील ३ कोटी ९२ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. दरोडेखोर येताना पायी आले त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेऊन पसार झाले.
यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी तपासासाठी विशेष पथकाची निर्मिती केली. यात एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन-पाटील यांच्यासह इतरांचा समावेश होता. या पथकाने कसून तपास केला असता त्यांना या प्रकरणाचा उलगडा झाला.
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: