दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव बसस्थानकात शनिवारी अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र सोयगाव आगाराच्या बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
शासनाने महिलांसाठी एस टी मध्ये दिलेली ५० टक्के सूट , ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास यामुळे महामंडळाची प्रवाशी संख्या वाढली आहे. विशेषतः महिलांची संख्या जास्त आहे. मात्र सोयगाव बसस्थानकात आसन व्यवस्थेची कमतरता असल्याने प्रवाशांना मिळेल त्याठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे .बसस्थानकात पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे बसस्थानकात बसणेकठीण झाले आहे. वाढत्या गर्दीमुळे बसस्थानकात प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोयगाव बसस्थानकात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दयावी अशी प्रवाशांमधून मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: