मराठवाडा : अजिंठा वनपरिक्षेत्रांतर्गत वीटभट्ट्यांसाठी लाकडांचा सर्रास वापर, रक्षकच भक्षक असल्याचा वृक्षप्रेमींचा आरोप.....
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील अजिंठा वनपरिक्षेत्रा अंतर्गत अवैधरित्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून कत्तल केलेल्या लाकडांचा सर्रास विटभट्ट्यांमध्ये वापर केला जात आहे. आर्थिक संबंधातून कारवाई केली जात नसल्याने रक्षकच भक्षक असल्याने वृक्षप्रेमींमधून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. मात्र लाकूड तस्करांकडून डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे. सोयगाव तालुक्यातील अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत धनवट ता.सोयगाव या गावाच्या आजूबाजूला रस्त्यालगतच जवळपास आठ ते दहा वीट भट्ट्या असून या वीट भट्ट्यांमध्ये सर्रास लाकडांचा वापर केला जात आहे.
ठाणा ता.सोयगाव व छत्रपती संभाजीनगर-जळगाव या महामार्गावर फरदापुर पासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर पूर्व बाजूस असलेल्या वीट भट्ट्यांमध्ये सुद्धा लाकडाचा वापर केला जात आहे. मात्र याकडे अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने रक्षकच भक्षक असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.लाकडांचा वापर करणाऱ्या विट भट्टी धारकांवर वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्याने कारवाई केलेली नाही. यामुळे वृक्षांची कत्तली चे प्रमाण वाढले आहे. रस्त्यालगत असलेल्या विटभट्ट्यांमध्ये लाकडांचा होत असलेल्या वापरामुळे रस्त्याने ये-जा करणारे दुचाकीस्वार, मजूर, वाहन धारक यांना वीट भट्ट्यांच्या प्रदूषणामुळे त्रास होत आहे तर धनवट गावातील नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. वीट भट्ट्यांमध्ये लाकडांच्या वापरावर अजिंठा वनविभाग काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: